मोक्ष म्हणजे आत्मस्वातंत्र्य, देहस्वातंत्र्य नव्हे. कारण देह हा काळ, कर्म, त्रिगुण इत्यादि अनेक पाशांनी बांधला आहे. तो त्यातून मुक्त होणार नाही. आत्मा हा स्वतंत्रच आहे. ते स्वातंत्र्य ज्ञानाने अनुभविणे म्हणजेच मोक्ष..!!
- सद्गुरु श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा या ग्रंथाचे सर्व हक्क प.पू.श्रीगुरू श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर यांच्याकडे राखीव .
Tuesday, 4 October 2016
अध्यात्मिक विचारधारा ७६
अध्यात्मिक विचारधारा ७५
वेदान्तशास्त्रांत आत्मज्ञान होणे याचा अर्थ अज्ञान जाणे हाच अभिप्रेत आहे. कारण ज्ञान हे उत्पन्न होत नाही, ते स्वतः सिद्ध आहे. 'अगा ज्ञान पै आपुले |', 'अनादि जे मुक्तता | आपुली असे पंडुसुता |' ज्ञा.
- सद्गुरु श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ७४
खरे पाहिले असता हा पिंजराही कल्पनेचाच आहे. तो मुळात नाहीच. जीव भ्रमाने आपण अडकलो असे समजतो. श्रीतुकाराममहाराज म्हणतात,
'शुक नळिकान्याये गुंतलासी काय | विचारूनि पाहे मोकळिया ||'
न कळतच जाळ्यात किंवा पिंजर्यात पशु पक्षी अडकतात. तसा जीवही न कळत या संसारपाशात अडकला आहे. 'पाहे गुंतलो नेणतां |' तु.म.
- सद्गुरु श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ७३
पिंजर्यात शिरणे सोपे असते. पण त्यातून बाहेर पडणे कठीण. तसे संसारात शिरणे सोपे. खरे म्हणजे जीव मूळचा शिरलेलाच आहे. किंबहुना शिरला म्हणूनच त्यास जीव म्हटले जाते. तो बाहेर पडू शकत नाही. किंबहुना पडण्याची इच्छाही करीत नाही..!!
- सद्गुरु श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ७२
काही कुलपे लावण्यास किल्ली पाहिजे व काढण्यासही पाहिजे. पण काही कुलपे काढण्यासच किल्ली पाहिजे. ती अंगानेच लागतात. तसे अविद्या, अज्ञान हे अंगचे कुलूप आहे. ते लागलेलेच आहे. फक्त ते काढण्यास गुरुकृपेची किल्ली पाहिजे..!!
- सद्गुरु श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ७१
संसारात बुभुक्षू (भोगासक्त) वमुमुक्षु असे दोन प्रकारचे लोक आहेत. बुभूक्षूत दोन प्रकार आहेत. मुमुक्षुत्वयोग्य व मुमुक्षुत्व अयोग्य. ज्यांचे पूर्व संस्कार चांगले आहेत, ज्यांची सद्वासना आहे, ज्यांना सत्संग व सच्छास्त्र श्रवणाची आवड आहे, ते मुमुक्षुत्व योग्य होत. तसे नसते तर सर्वच मुमुक्षु झाले असते. मुमुक्षुतही दोन प्रकार आहेत.स्वतंत्र प्रज्ञ व परतंत्रप्रज्ञ. असंभावना, विपरित भावना ज्यांना बाधा करू शकत नाहीत, केवळ महावाक्यश्रवणानेच ज्यांना तत्काल बोध होत नाही. त्यांना श्रवण, मनन, निदिध्यासन किंवा योगध्यानादि साधनांचे अवलंबन करावे लागते, त्यांना परतंत्र म्हणतात..!! - सद्गुरु श्रीधुंडामहाराज देगलूरकर
Thursday, 29 September 2016
अध्यात्मिक विचारधारा ७०
वेद त्रिकांडात्मक आहे, म्हणजे
वेद, कर्म, उपासना, ज्ञान सांगतो.
किंबहुना 'वेदु काय काय न बोले |' असे श्रीज्ञानेश्वरमहाराज म्हणतात. 'पण या सर्वांचे तात्पर्य साक्षात् वा परंपरेने परमात्मस्वरूपातच आहे. मात्र तो समन्वय कळणे कठीण आहे.'
'सर्वे वेदायत्पदमामनन्ति |' असे वेदच म्हणत आहे..!!
- सद्गुरु श्रीधुंडामहाराज देगलूरकर
Wednesday, 28 September 2016
अध्यात्मिक विचारधारा ६९
वेद म्हणजे ज्ञान. ज्ञानाचा विषय ज्ञेय परमात्माच होऊ शकतो. अन्य कोणी ज्ञानाचा विषय होत नाही. हे मागे सांगितलेच आहे. म्हणून वेद परमात्म्यासच विषय करतो. 'वेदेश्च सर्वेरहमेव वेद्यः |' असे भगवानच सांगतात..!!
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
Tuesday, 27 September 2016
अध्यात्मिक विचारधारा ६८
वेदाचे तात्पर्य परमात्मवर्णनातच आहे.
तसे नसते तर वेद, मिथ्या संसाराचे वर्णन करील. तो अनर्थावह झाला असता. कोणीही शहाणा खोट्याचा अंगिकार करीत नाही. वेदांपेक्षा कोण जाणता आहे? 'पाहे पां जाणिववेचेनि बळे | कोणी वेदापासूनि असे आगळे |' ज्ञाने. ०९
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
Sunday, 25 September 2016
अध्यात्मिक विचारधारा ६७
प्रमेयाची सिद्धी प्रमाणाने होते. म्हणून प्रथम प्रमाणाचा विचार करणे अशक्य आहे. मात्र ते प्रमाण असे पाहिजे की कोणत्या अन्य प्रमाणाने त्याचे अप्रामाण्य सिद्ध न झाले पाहिजे. कोणी म्हणेल, प्रमाणाची सिद्धी कोण करणार ? याचे उत्तर हे की प्रमाण हे आपली सिद्धी करूनच प्रमेयाची सिद्धी करते. डोळ्याकरिता दुसरा डोळा किंवा सूर्य, दीप यांच्याकरिता दुसर्या सूर्याची किंवा दीपाची गरज नाही..
असे अप्रामाण्य कारणरहित स्वतः प्रमाणभूत एक श्रुतिप्रमाणच आहे. पुरुषबुद्धीत जे भ्रम, प्रमादादि दोष असतात, ते वेद अपौरुषेय असल्याने त्यात नाहीत..!!
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ६६
वेदान्ताचा प्रपंचाशी विरोध
नाही, त्याच्या सत्यत्वाशी विरोध आहे.
तो कल्पित मानला तर काही हरकत नाही. रज्जूचा सर्पाशी विरोध नाही. कारण तो रज्जूवर भासला. मात्र ज्या सत्तेतील रज्जू आहे, त्या सत्तेतील तो असू शकणार नाही.
दोघांची एक सत्ता मानल्यास अध्यस्तअधिष्ठानभावसंबंध, कार्यकारणभावसंबंध सिद्ध होणार नाही
व अधिष्ठानाच्या ज्ञानाने अध्यस्ताची जी निवृत्ति अनुभूत आहे त्याची उपपत्ती लागणार नाही..!!
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ६५
जगात तीन प्रकारच्या वस्तू आहेत. काही झालेल्या उदा. पर्वत, समुद्रादिक, काही केलेल्या, उदा. घटादिक व काही भासलेल्या. उदा. रज्जूसर्प शुक्तिरजत इत्यादी. स्वभाववादांत जग झालेले मानले जाते. नैय्यायिक योगी सांख्यादिक केलेले मानतात, तर वेदान्ती भासलेले असे मानतात. भासलेली वस्तू प्रमात्याला अज्ञानाने भासते. 'आपुलिया अज्ञानासाठी | नव्हता थांबला किरीटी |' असे न मानले तर ज्ञानाने मोक्ष सिद्धच होत नाही. पण'तमेव विदित्वा अति मृत्युमेति |' इत्यादि श्रुतिज्ञानानेच मोक्ष मानतात. याकरिता श्रुतार्थापत्तीनेच संसार हा अज्ञानकार्यच मानावा लागतो..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ६४
मौल्यवान वस्तू अनेक वेष्टनात ठेवली जाते. तसा सच्चित्सुखघन आत्माही (अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय
व आनंदमय या) पंचकोशाच्या वेष्टनात ठेवला गेला आहे. विवेकाने या कोशांचा निरास झाल्याविना त्याची प्राप्ती होणार नाही..!!
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ६३
'अहमज्ञ:' हे अज्ञानाचे जरी ज्ञान असले तरी ते ज्ञान अज्ञाननिवर्तक होऊ शकत नाही. तर अधिष्ठानाचे प्रमाणजन्य ज्ञानच अज्ञाननिवर्तक असते. अज्ञानाचे ज्ञान हे सहाय्यक होते. रोगाचे ज्ञान हे रोग निवृत्त करीत नाही, तर औषधच रोगमुक्त करू शकते. रोगाचे ज्ञान औषध घेण्याकडे प्रवृत्त करून साहाय्यक होते..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ६२
भेद म्हणजेच अन्योन्याभाव, वस्तुपरिच्छेद, घटपट कसा होईल ? कारण त्यांचा अन्योन्याभाव म्हणजे
भेद आहे. घटांचे ठिकाणी घटत्वधर्म व पटाचा पटत्वधर्म आहे. दोघे धर्मी भिन्न असताना व ते धर्म सत्य असताना त्यांचा बाध होऊन अभेद कसा सिद्ध होणार ? म्हणूनच वेदान्तात जीवत्वधर्म कल्पित मानला आहे. 'मायायोगें जीव दशे आले !|', 'अविद्या कल्पना येणें झाला जीव |' कल्पिताचा भेद खरा नसतो..!!
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ६१
'सर्व खल्विदं ब्रह्म', 'विश्वब्रह्म'
याचा अर्थ विश्व नाही, ब्रह्मच आहे असा होतो. कारण, 'नेह नानास्ति किंचन',
तुका म्हणे दुजे | हे तो नाहींच सहजे ||' असा त्याचा निषेध केला आहे. दोन वस्तूंचा जेव्हा अभेद सांगितला जातो, तेव्हा त्यापैकी एक कल्पित असावी लागते..
दोन सत्य वस्तूंचा कधीही अभेद होत नाही, तसेच दोन मिथ्या वस्तूचाही अभेद होऊ शकत नाही..!!
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ६०
जगन्मिथ्यात्वज्ञानातच अधिष्ठान सत्याचा शोध लागतो. याकरिता ते होणे अवश्य आहे. म्हणूनच महात्मे 'लटिका व्यवहार सर्व हा संसार |', 'नाशिवंत देह जाणार सकळ |' असे आक्रोशपूर्वक
सांगत असतात..!!
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ५९
भ्रम, अज्ञान हे एकच होत.
भ्रमाचे प्रकार दोन. निश्चयात्मक, आणि संशयात्मक; निश्चयात्मक भ्रमाचे स्वरूप असे असते की असतो भ्रम, पण तो भ्रमत्वाने कळत नाही, तर ते यथार्थ ज्ञानच वाटते. रज्जूज्ञान होईपर्यंत सर्पज्ञान हे भ्रम आहे. असे न वाटता ते यथार्थच आहे असे वाटते. म्हणूनच पलायनादि क्रिया होतात. बद्धास जो भ्रम असतो तो निश्चयात्मय होय. अर्जुनाची अ. एक मधील भूमिका हीच होती. मुमुक्षुचा भ्रम गेलेला नसतो.
तो संशयात्मक असतो. त्याची निवृत्ति उपदेशाने होते. आपले काहीतरी कोठेतरी चुकते असे वाटणे हे संशयात्मक भ्रमाचे सामान्य स्वरूप होय..!!
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ५८
मानवाची परमार्थाकडे प्रवृत्ति न होण्याचे कारण स्वच्या अज्ञानाचे अज्ञान, मनुष्यास 'मी अज्ञ आहे.' असे वाटू लागले की तो ते निवृत्त करण्याकडे प्रवृत्त होईलच. रोगाचे अज्ञान असेल तर औषध घेऊन रोगनिवृत्तीचा प्रयत्न होत नाही. याकरिता त्याचे ज्ञान असणे उचित आहे..
अज्ञानी असून अज्ञानास न जाणणारा, तो बद्ध, स्वच्या अज्ञानास ओळखणारा मुमुक्षु. तो त्याच्या निवृत्तीचा योग्य प्रयत्न करील. ज्याचे स्वप्रयत्नाने अज्ञान (प्रमाज्ञानाने) निवृत्त झाले तो मुक्त.
सर्वांचे अज्ञान घालविण्याचे ज्याचे सामर्थ्य आहे तो संत होय..!!
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ५७
शरीरे जशी तीन आहेत, तसे त्या त्या शरीराचे रोगही त्रिविध आहेत. स्थूल शरीराचे बहात्तर हजार रोग आहेत. यात कफ, पित्तापासुन होणारे, ज्वर, अतिसार, क्षय, संग्रहणी, पांडु इत्यादी. सूक्ष्म शरीराचे काम, क्रोध, लोभादि विकार. कारण शरीराचा रोग म्हणजे स्वस्वरूपाचे अज्ञान.. कारण शरीर म्हणजेच जर अज्ञान, तर त्यासही पुन्हा रोग कसा ? अज्ञानाचेही अज्ञान असणे हा कारण शरीराचा रोग होय. अज्ञानाचे अज्ञान. म्हणजे मी अज्ञ आहे असे न कळणे होय. 'जाणता तरी म्हणविसी | परी नेणिवेते न संडिसी |' असाच प्रकार बहुतेकांचा असतो..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ५६
पारमार्थिक म्हणविणा-या वर्गात साध्याभिनिवेशापेक्षा साधनाभिनिवेशच अधिक दिसून येतो. तो योग्य नाही. साध्याभिनिवेश असावा. तो खरा असल्यावर त्याच्या नियत साधनाचे ज्ञान संपादन करून मगच त्या साधनाचा अभिनिवेश ठेवणे योग्य आहे..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ५५
संसार म्हणजे न पुसले जाणारे प्रश्नचिन्ह. याचा अर्थ संसारात पूर्णविराम नाहीच. पैसा मिळाला, पुढे काय ? संतती झाली, पुढे काय ? सत्ता, वैभव मिळाले, पुढे काय ? हे नेहमी चालूच राहणार. म्हणूनच त्यास प्रश्नचिन्ह असे म्हटले आहे.. परमार्थात मात्र पूर्णविराम आहे. विराम म्हणजे विश्रांती, कृतकृत्यता, निष्कामता, दुःखाभाव इत्यादी..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ५४
काच ही तीन प्रकारची असते.
1. साधी, 2. आरसा व 3 फोटोची निगेटिव्ह म्हणजे ज्या काचेवर फोटो उमटतो ती, साध्या काचेत पलीकडील सर्व दिसते, पण स्वतःचा चेहरा दिसत नाही. आरशात तो दिसतो, पण जोपावेतोच पाहणारा समोर असतो तोपावेतोच.
तो दूर गेला की काही नाही. फोटोच्या काचेवर एकदा ठसा उमटला की तो टिकून राहतो. तसेच मनुष्याचे मन त्रिविधा आहे. एका मनास बाह्य सर्व वस्तूंचे ज्ञान होते, पण आत्मा दिसत नाही. ध्यानमुक्त अंतःकरणात भगवत्साक्षात्कार होतो,
पण ध्यानकालीच. पण काही भक्तांना
सर्व काली भगवत्साक्षात्कार होतो.
'पांडुरंग ध्यानीं पांडुरंग मनीं |
जाग्रती स्वप्नी पांडुरंग ||'
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ५३
कर्म कर्त्यांवर अवलंबून असते व ज्ञान हे प्रमाणाधीन असते. कर्मात कर्ता स्वतंत्र असतो, म्हणजे करणे न करणे त्याचा हातात असते. पण प्रमाण प्रमेय संबंध घडला की मनात असो वा नसो, ज्ञान होणारच. म्हणून कर्मास कर्तृतंत्र व ज्ञानास वस्तुतंत्र म्हणतात..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ५२
प्रपंच व परमार्थात विशेषतः (साध्यातच) भेद आहे. साध्य बदलले
की तेच साधन दुसरीकडे उपयोगी पडते.
उदा. ज्या कानांनी गाणे ऐकावयाचे, त्याच कानांनी भगवद्गुणानुवादही ऐकावयाचा. ज्या डोळ्यांनी सिनेमा बघावयाचा, त्याच डोळ्यांनी भगवन्मूर्तीचे दर्शन घ्यावयाचे. ज्या मनाने विषयाचे ध्यान करावयाचे, त्याच मनाने भगवद्ध्यान करावे लागते. ज्या बुद्धीने विषयाचे ज्ञान होते. तीच बुद्धी ही परमात्मज्ञानाचे साधन होऊ शकते. मात्र ती इंद्रिये, मन, बुद्धी ही संस्कारित पाहिजेत म्हणजे शुद्ध पाहिजेत, तेव्हाच त्यांचा परमार्थाकडे उपयोग होतो..!!
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ५१
आकाशात विमान चालू शकते, पण स्थिर राहू शकत नाही. स्थिर राहण्याकरिता त्यास पृथ्वीचाच आश्रय करावा लागतो. तसे संसारात मन सतत भ्रमण करीत असते, पण स्थिर राहत नाही. ते परमात्मस्वरुपीच स्थिर राहील. 'तुका म्हणे चित्ता | वाट न व्हावा परता ||', 'अचळ न चळे ऐसे झाले मन | धरूनि निज खूण राहिलोंसे ||' - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ५०
ज्ञान दोन प्रकारचे मानले जाते. ज्ञानापासून म्हणजे प्रमाणापासून उत्पन्न होणारे ज्ञान व अज्ञानापासून उत्पन्न होणारे ज्ञान. उदा. रज्जूवर होणारे सर्पज्ञान हे रज्जूच्या अज्ञानापासून होणारे आहे, पण रज्जूचे यथार्थ ज्ञान ते ज्ञानापासून म्हणजे प्रमाणापासून होणारे आहे. तेच ज्ञान खरे व सफल होय.
ज्ञानकर्मसमुच्चय संसारात शक्य आहे, किंबहुना ज्ञानकर्मसमुच्चय म्हणजेच संसार. संसारातील ज्ञान व कर्म एकाच सत्तेतील असते. पण परमार्थात तो शक्य नाही. कारण ते ज्ञान कर्म उरू देत नाही. 'ज्ञानाग्निः सर्व कर्माणि भस्मसात्कुरुते तथा |' गीता..!!
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ४९
'न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा |' असे श्रीकृष्णांनी गीता अ. 15 श्लोक 3 मध्ये संसाराचे स्वरूप सांगितले आहे. अशा रूपाने त्यास कोणी जाणतात काय ? किंवा अशा रूपाने जाणत नाहीत म्हणूनच आसक्त होऊन संसार करतात व दुःख भोगतात असेच म्हणावे लागते..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ४८
कोणी म्हणेल संसाराचे जर ज्ञान नाही तर संसार करतात कसे ? संसार करण्याकरिता त्यांचे यथार्थ ज्ञानच असावे लागते असे नाही. सर्वच जेवतात, पण स्वयंपाक करण्याचे सर्वांनाच ज्ञान असते असे नाही. रेल्वेने सर्वच लोक प्रवास करतात, पण चाकाला गती कशी मिळते. वाफ कशी बनते इत्यादि गोष्टी सर्वांनाच समजतात असे नाही. व्यवहाराला सामान्य ज्ञानही सुटते..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ४७
सर्व लोक संसार करतात, पण संसाराला जाणत नाहीत. सर्वांना संसाराची खरी ओळख म्हणजे ज्ञान असते तर 'यस्तं वेद स वेदवित्' (जो त्या संसारास जाणतो तो वेदवेत्ता, सर्वज्ञ होय) असे श्रीकृष्णांनी गीता अ. 15 च्या प्रथम श्लोकात म्हटलेच नसते. जाणणे याचा अर्थ विशेष ज्ञान. एखादी वस्तू कार्य असेल तर तिचे कारण कोण ? संबंध काय ? सत्य का असत्य इत्यादि यथार्थ ज्ञान म्हणजे जाणणे. तसे संसाराचे यथार्थ ज्ञान सर्वांना नाही..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ४६
वेदान्तशास्त्रात जगही ज्ञेय व परमात्माही ज्ञेय आहे असे म्हटले आहे. जग ज्ञेय याबद्दल गीता अ. 18 मध्ये 'ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता' हा श्लोक प्रमाण आहे. परमात्मा ज्ञेय याबद्दल
'ज्ञेयं यत्तत्प्रवक्ष्यामि','भूतभर्तृच तज्ज्ञेयं'इत्यादि श्लोक प्रसिद्ध आहेत. त्यात फरक एवढाच की परमात्मा हा यथार्थ ज्ञानाचा विषय या रूपाने ज्ञेय आहे. म्हणून त्याच्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो व जग अन्यथा ज्ञानाचा विषय म्हणून ज्ञेय आहे. स्वप्नातील पदार्थाप्रमाणे. म्हणून त्याच्या ज्ञानाने बंध प्राप्त होतो..!!
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ४५
'विसिन्वन्ति अवबध्नतीति विषयाः |' म्हणजे जीवास जे भोगात बांधून टाकतात ते विषय. जो जीवास बांधतो म्हणजे परतंत्र बनवितो तो सुखरूप कसा ? विषयांत सुख आहे म्हणजे अनुकूल विषयसेवनाने सुख झाल्यासारखे वाटते. पण विषय सुखरूप नाहीत, म्हणजे सुख हा जडाचा धर्म होऊ शकत नाही..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ४४
कारले कडू असते हे प्रसिद्ध आहे. त्याची भाजी केली जाते. तीत पदरचा गूळ, चिंच, मसाला इत्यादि घालून त्यात गोडी आणली जाते. मात्र म्हणताना कारल्याची भाजी फार गोड झाली आहे असे म्हटले जाते. त्याप्रमाणे विषय हे तमोगुणाचे कार्य म्हणून स्वरूपाने दुःखरूपच आहेत. पण त्यात अज्ञानाने अनुकूल बुद्धी ठेवून स्वरूपानंद त्यांच्याद्वारा भोगला जातो. म्हणूनच श्रीज्ञानेश्वरमहाराज म्हणतात, 'विषयाचें जें सुख | ते साद्यंतचि जाण दुःख | परी काय कीजे मूर्ख | न सेवितां न सरे ||' - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ४३
अध्यास, भ्रम, भास, अज्ञान, अवभास हे पर्याय शब्द होत. भ्रम सर्वांनाच मान्य आहे. म्हणजे दोरीवर सर्प दिसला नाही किंवा दिसणार नाही असे कोणीही म्हणत नाही. फक्त तो कसा व का दिसला यात शास्त्रकारांत मतभेद आहेत. हा ख्याती विचार फार विस्तृत व बुद्धीची कसोटी पाहणारा असा ग्रंथांतरी आहे. अध्यासाचे अनिर्वचनीयत्व इतरांना पटत नाही..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ४२
दोरी सर्प होत नाही किंवा दोरी सर्पाला निर्माणही करीत नाही. कारण दोन्ही गोष्टी दोरी जड असल्यामुळे तिच्याकडून होणे शक्य नाही. तर दोरीवर प्रमात्याच्या दृष्टीने भ्रमाने त्यास सर्प भासला. या भासण्याला सादृश्यादि दोषामुळे तिचा काय उपयोग झाला असेल तेवढाच..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ४१
दोरीवर सर्प भासण्यास प्रमातृ दोष, प्रमाण दोष, प्रमेय दोष, सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार, अधिष्ठानाचे सामान्यत्वेकरून ज्ञान, विशेष रूपाने अज्ञान इत्यादी हेतू सांगितले आहेत. पण दोरीचे ज्ञान होण्याला या हेतूची आवश्यकता नाही. केवळ विषय व नेत्रेद्रिंयाचा संबंध घडून आला की ते होते. ते निर्दोष असते. म्हणून त्यास प्रमाज्ञान म्हणतात..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ४०
सामान्यांना जग हे सत्य वाटणे स्वाभाविक आहे. मृगाने मृगजळाला भाळावे यात नवल काय ? वाटते तसे असतेच असे नाही. स्वप्नकाली स्वप्नातील वस्तू सत्यच वाटतात. पण त्या जागृतीत टिकत नाहीत. म्हणून त्यास सत्य म्हणता येत नाही. व्यवहारातही केवळ दिसण्यावरून कोणी त्यावर विश्वास ठेवत नाही, मग परमार्थात त्यास सत्य कसे मानावे ? - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ३९
माया किंवा जग हे असद्विलक्षण पण सत् नव्हे. कारण सत् म्हटले की त्रिकालाबाधितत्व येते. म्हणून त्यास सद्विलक्षण असेही म्हणण्याची परिभाषा आहे. 'तैसे सत् ना असत् होये | जें विचाराचें नाम न साहे |' असे श्रीज्ञानेश्वरमहाराजांनीही म्हटले आहे. म्हणूनच त्यास अनिर्वचनीय ही संज्ञा शास्त्रात दिली आहे..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ३७
सर्व माणसांची धाव सत्याकडेच आहे. त्यांना सत्यच पाहिजे असते. सत्य न मिळाल्यास असत्यास सत्य ठरविण्याचा ते प्रयत्न करीत असतात. म्हणूनच सत्य ही प्रकृती व असत्य ही विकृती म्हटली जाते. जगात असत्य खपते. पण ते सत्याच्या नावाखाली खपते. असत्य नावाने खपत नाही. हा सत्याचाच विजय नव्हे काय ? - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ३६
खडीसाखरेचे अनेक खडे जरी विषम असले तरी गोडी ही समानच असते. तद्वत् काही माणसांचे वर्तन जरी विषम दिसत असले तरी ते समत्वपूर्णच असते. साधूसंतांचे असेच असते..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ३५
तळ्यातील पाण्याची पातळी वरून समान दिसते, पण आत मात्र खोली समान नसते. तद्वत् काही माणसे वरून सरळ दिसत असली तरी आत ती समता नसते, सर्व विषमताच असते. सध्या अशाच समतेचा उद्घोष केला जातो..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ३४
हिमालय पर्वत हा केवळ हिम म्हणजे बर्फमय आहे. तेथे सर्व थंडीच थंडी असते. पण त्याच्या पोटातही कोठे कोठे उष्णोदकाचे झरे दिसून येतात. त्याच्या सान्निध्यात गेलेल्यांना तेवढ्यापुरती थंडी दूर झाल्यासारखी वाटते. तद्वत् संसार हा सर्व दुःखाचाच भरलेला आहे. पण त्यातही क्वचितच अनुकूल विषयाची प्राप्ती झाली असता सुख प्राप्त होऊन दुःख दूर सरल्यासारखे वाटते..!!
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ३३
आत्मस्वरूपी क्रिया नाही. संस्कार नाही असे म्हटले जाते. याचा अर्थ विशिष्ट आत्म्यावर संस्कार. मग ते गुणाधान वा दोषानयन या उभय रूपाने होत असतात. केवळ शुद्ध जो आत्मा तो अक्रिय, असंग आहे. विशिष्टत्व धर्म आत्म्याच्या ठिकाणी कल्पित आहे..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
अध्यात्मिक विचारधारा ३२
योग व भोग यात जीव राहतो. भोगातही योग आहे, पण तो वियोग करणारा आहे, तो खरा नाही. भोग जर तुच्छच आहेत तर त्याचा योगही पण तुच्छच होणार? तसेच विजातीयांचा योग हा भोगात असतो. विषय हे जड, जीव हा चेतन म्हणून त्यांचा विजातीय संबंध होतो. त्या संबंधातील भोग हा भ्रमरूपच असतो..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
अध्यात्मिक विचारधारा ३१
क्रियेने चार गोष्टी असतात. उत्पत्ती, प्राप्ती, विकार, संस्कार ह्या त्या चार गोष्टी आहेत. जसे मृत्तिकेपासून घट उत्पन्न होतो. यास कुलाल क्रिया कारण आहे. एखाद्या माणसास चालण्याच्या क्रियेने एखाद्या ग्रामाची प्राप्ती होते. दुधाचे दही विरजवण्याच्या क्रियेने होते. बीजाचा वृक्ष पेरण्याच्या क्रियेने होतो. हा विकार होय. यानंतर संस्कार. त्यात वर्ग दोन, गुणाधान व दोषापनयन. एखाद्या वस्त्राला रंग देणे, भांड्याला कल्हई करणे किंवा अन्य धातूचा मुलामा देणे म्हणजे पूर्वी नसलेला नवा गुण (पण जो धारण करण्यास ती वस्तू समर्थ आहे तो) त्याचे ठिकाणी आणून ठेवणे हा गुणधानात्मक संस्कार होय. यास त्या त्या दृष्टीने योग्य अशी क्रिया कारण आहे..!! -सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
अध्यात्मिक विचारधारा ३०
खरे म्हटले तर कर्मही नवीन काही करीत नाही, तर ज्या वस्तूमध्ये जी निसर्गदत्त शक्ती आहे ती प्रगट करणे एवढेच त्याचे काम. मृत्तिकेत घटाकार धारण करण्याची शक्ती आहे म्हणजे घटरूपाने तिचा परिणाम होऊ शकतो, बीजाचा वृक्षरूपाने परिणाम होऊ शकतो. तो होण्याला निमित्तकर्त्यांची क्रियाही असते. ज्याचे ठिकाणी जे सामर्थ्य नाही ते कर्ता आपल्या क्रियेने निर्माण करू शकत नाही..!! -सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
अध्यात्मिक विचारधारा २९
वेदान्तशास्त्राच्या दृष्टीने दुःखही 'प्रकृति' (म्हणजे जीवाचा स्वभाव) नाही, तर ते 'विकृति' आहे. दुःख जर प्रकृति असते तर त्याच्या नाशाची इच्छाच झाली नसती. कारण स्वरूप नाशाची अपेक्षा कोणी करीतच नसतो..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
अध्यात्मिक विचारधारा २८
भर प्रकाशातही अंधार उत्पन्न होण्यास वेळ लागत नाही. त्या प्रकाशाला थोडा प्रतिबंध झाला की अंधार. तद्वत परमार्थाला प्रतिबंध झाला की प्रपंच उद्भवलाच. तेवढा प्रतिबंध गेला की अंधारच प्रकाश बनतो. त्याप्रमाणे प्रपंचच परमार्थरूप होतो.
'अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे आता |'
-सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
अध्यात्मिक विचारधारा २७
वेदान्त सिद्धांताप्रमाणे यथार्थ ज्ञानातून अज्ञान वजा जाते यथार्थ ज्ञान झाले म्हणजे अज्ञान मुळीच राहत नाही. पण अज्ञानातून मात्र संपूर्ण रीतीने ज्ञान कधीच वजा जात नाही. अज्ञानकालीही सामान्य रूपाने ज्ञान व ते यथार्थ असे असतेच..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
अध्यात्मिक विचारधारा २६
व्यवहारात काही वेळा एखाद्या वस्तूचे केवळ सामान्य ज्ञानच होते. याचे कारण प्रतिबंध. त्यावेळी त्याच्या विशेषरूपाने अज्ञान असते. पण ज्यावेळी प्रतिबंध निरासानंतर विशेष रूपाने यथार्थ ज्ञान होते, त्यावेळीही सामान्य रूपाने ज्ञान असतेच, सामान्य रूपाने अज्ञान नसतेच.!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
अध्यात्मिक विचारधारा २५
जे ज्ञान सत्य नाही म्हणजे त्रिकालाबाधित नाही; त्यासच अज्ञान असे म्हटले जाते. अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव नव्हे,
तर वेदान्तशास्त्रात ते भावरूप मानले आहे. फक्त ते सत्य म्हणजे त्रिकालाबाधित नसते. रज्जुवर सर्प भासणे हे सर्पज्ञानच आहे. पण ते रज्जुच्या ज्ञानानंतर राहत नाही, म्हणूनच त्या ज्ञानास अज्ञान असे म्हणतात..!!
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
अध्यात्मिक विचारधारा २४
ज्ञान व सत्य याचे जवळचे नाते आहे. किंबहुना ते सत्य असेल तरच ज्ञान व असत्य असेल तर अज्ञान ठरते.
उदा. गणितात बे दुणे चार हे ज्ञानही आहे व ते त्रिकालाबाधित सत्यही आहे. कारण केव्हाही कोठेही कोणीही बे दुणे पाच करू शकत नाही. पण हा सिद्धान्त अद्वैत वेदान्तशास्त्रातच यथार्थरित्या संभवतो. इतर मतात सत्य व ज्ञान भिन्न अधिकरणात राहू शकतात..!!
* सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
अध्यात्मिक विचारधारा २३
पाण्याची आवश्यकता कोणास नाही ? म्हणूनच त्यास जीवन म्हणतात. मनुष्य, पशू, पक्षी सर्वांना त्याची आवश्यकता आहे. मात्र तहान लागेल तेव्हाच मनुष्य पाणी पिईल, किंवा पाण्याजवळ जाईल व मोजके पाणी घेईल. पण त्यास पाण्यातच राहा म्हटले तर राहणार नाही. ते त्याच्या सामर्थ्याच्या बाहेरचे आहे. बेडकुळी, साप इत्यादि प्राणी पाण्यातही राहतात व बाहेरही राहू शकतात. मासोळी मात्र फक्त पाण्यातच राहील, बाहेर राहू शकत नाही हे प्रसिद्ध आहे. संसारात बरेच लोक असे आहेत की ज्यास देव पाहिजे, पण दुःखाचे वेळी. ते दुःख नाहीसे करणाऱ्याचे साधन म्हणून देव पाहिजे. तेवढे दुःख नष्ट झाले म्हणजे देवाचा संबंध तुटला. सकाम व्रते करणारे इत्यादी. कित्येक सुखात असूनही देवास विसरत नाहीत. संसारात राहतात व नित्यपूजा, जप, ध्यान इत्यादि साधनेही करताना. देवास संपूर्णतया विसरत नाहीत. तर कित्येक दुर्लभ असे भक्त सुखदुःख, लाभहानि इत्यादिकांचा विचार न करता संसाराकडे पाठ फिरवून 'पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी | जागृती स्वप्नी पांडुरंग ||' अशा स्थितीत नित्य देवाचेच बनून सदा भक्तीतच रममाण होतात..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
अध्यात्मिक विचारधारा २२
पाणी गढूळ झाले तर निवळीचे बी त्यात उगाळून घातले असता गाळ खाली बसतो. पुन्हा ढवळले की गाळ वर येतो. तसेच चित्तातील विकाराने ते गढूळ झाले तर योगादि साधनांनी तो गाळ खाली बसतो. तेवढ्यापुरते ते स्वच्छ झाल्यासारखे भासते, पण पुन्हा चित्त विक्षिप्त वृत्तीने मुक्त झाले की ते मलिन बनते.
म्हणून पवित्रता ही केवळ ज्ञानैक साध्य आहे असे गीतेत म्हटले आहे. 'नहि ज्ञानेन सदृश्यं पवित्रमिह विद्यते |'
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
अध्यात्मिक विचारधारा २१
मानवी जीवनात पंचभूतात्मक देह असल्यामुळे आहार, निद्रादिक निसर्गतः आहेतच. पण विकसनशील बुद्धी म्हणजे ज्ञान, हे अधिक प्रमाणात त्याच्या वाट्यास आल्यामुळे भौतिक जीवनाबरोबर कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, नैतिक व आध्यात्मिक असे त्याचे जीवन विस्तृत आहे. त्यातून त्याला गेलेच पाहिजे. हे जीवन सांभाळील तोच श्रेष्ठ मानव समजला जाईल. मानवावर निसर्गप्राप्त ही जबाबदारी आहे. कायदा, नीती, धर्म, समाज, अध्यात्म इत्यादि मानवी जीवनातच वापरली जाणारी मूल्ये आहेत. त्यांचा विसर त्यास पडणे म्हणजे त्याने आपले अमूल्य जीवन गमावले असे होईल..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
अध्यात्मिक विचारधारा २०
संसार व परमार्थ या दोन्ही जीवनाच्या दोन बाजू आहेत. नाण्याच्या दोन्ही बाजू एकाच वेळी वर येत नाहीत. एक वर तर दुसरी खाली असे असतेच. तसेच प्रपंचाची बाजू वर तर परमार्थाची बाजू खाली म्हणजेच झाकलेली राहणारच. जर परमार्थाची बाजू वर तर प्रपंचाची खाली झाकली जाणार..!!
संसारातून परमार्थाकडे जाता येते, पण खरा परमार्थ जर साधला असेल तर मात्र पुन्हा संसारात परत येता येत नाही. कारण संसारच राहत नाही. 'अवघाची संसार केला ब्रह्मरूप |' किंवा परत येणारा जीवच उरत नाही. 'तो जीव हे भाष सरे |'
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
अध्यात्मिक विचारधारा १९
जीवन हे दुःखमय का सुखमय ? असा प्रश्न कित्येकदा पडतो. विचार केला तर सुखमयता हाच जीवनाचा स्थायीभाव दिसून येतो. जीवाच्या अवस्था तीन. जाग्रत, स्वप्न व सुषुप्ति ! जाग्रतीत सुखही व दुःखही आहे, स्वप्नात सुख व दुःख आहे, पण सुषुप्तित केवळ सुख, मात्र ते आवरणासहित आहे. *मोक्षात निरावरण सुख असते. म्हणजे सुखाचा अन्वय (संबंध) सर्व अवस्थेत आहे. पण दुःखाचा अन्वय सर्व अवस्थेत नाही..!!* - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
अध्यात्मिक विचारधारा १८
स्वहित हा शब्द नेहमी वापरला जातो व त्याची अपेक्षाही सर्वांच्याकडून होते. पण त्याचे स्वरूप मात्र कळत नाही. म्हणून ते प्राप्त होत नाही. कारण स्वहित हे स्वचे जे स्वरूप ठरेल त्यावर अवलंबून राहील.
स्व म्हणजे देह, इंद्रिये असे मानले तर विषयोपभोग, इंद्रियतृप्ति हेच हित होईल. पण या भोगाने देहाचेही हित झालेले दिसत नाही. कारण देहासही वार्धक्य, रोग, मृत्यू इत्यादि होतातच. तसेच
स्व म्हणजे मन म्हटले तर ते जड आहे. त्यास स्वतःच्या हिताहिताचे ज्ञान असणे शक्य नाही. तसेच ते कारण आहे, कर्ता नाही. 'स्व' शब्द आत्मवाची आहे. आत्म्याचे हित त्याच्या स्वरूपज्ञानातच आहे. कारण स्वरूपविस्मृतीने बंध तर स्वरूपसाक्षात्काराने मोक्ष हेच आत्महित आहे..!!
-सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
अध्यात्मिक विचारधारा १७
प्रमाता म्हणजे जीव. त्यास शास्त्रीय भाषेत प्रमातृ चैतन्य असे म्हणतात. ज्या वेळी अंतःकरण चैतन्याच्या स्वरूपात आंतर्भूत होऊन वर्तमान व्यावर्तक होते, त्या वेळी ते विशेषण होते व चैतन्य विशेष्य होते. पण हा विशेषण-विशेष्य भाव कल्पित आहे, वास्तव नाही. वास्तव असता तर ज्ञानाने त्याचा बाध झाला नसता. ज्या वेळी जीव ज्ञानसंपन्न होतो त्यावेळी अंतःकरण, मन हेही आपले स्वरूप नव्हे, ते कारण आहे, कल्पित आहे, असे समजतो. प्रमातृत्व हा बंध आहे. वर लिहिल्याप्रमाणे जेव्हा त्या जीवास बोध होते, तेव्हा प्रमाता जीव या बंधनातून मुक्त होतो, त्या बरोबर कर्ता, भोक्ता, ज्ञाता या सर्व अज्ञान परिकल्पित भावना नष्ट होतात. म्हणून आत्मज्ञानानंतर कर्म नाही. 'तेथे स्वभावे धनंजया | नाही कोणीच क्रिया |' हीच कृतकृत्यता होय.. - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
अध्यात्मिक विचारधारा १६
संसारातील ज्ञान न संपणारे म्हणून क्रियाही न संपणारीच असते, ज्ञान संपत नाही. याचा अर्थ ज्ञेयानुसार ज्ञान होत असते. ज्ञेय अनंत आहेत. म्हणून त्यांची ज्ञानेही अनंत आहेत. त्या अनंत ज्ञेयाच्या ज्ञानानुसार त्यांची प्राप्ती होण्याकरिता केल्या जाणाऱ्या क्रियाही अनंत होतात. ज्ञान, क्रिया व क्रियेचे फळ भोगण्याकरिता देह, पुन्हा ज्ञान, पुन्हा क्रिया, हे रहाटगाडगे अखंड चालू असणे यासच संसार म्हणावे, 'वृत्ति ऐसे मन धरती | मना ऐसी क्रिया करिती | केलिया ऐसी वरती | मरौनि देहे ||' असे श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात.. - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
अध्यात्मिक विचारधारा १५
लग्नसमारंभात वधुवरांवर अक्षता टाकण्याची पद्धत आहे.त्या टाकताना इतरांच्या अंगावरही पडतात.पण कोणी असे समजू नये की आमचे लग्न झाले.लग्न वधूवरांचेच होते.कारण , तेच तेथे अधिकारी आहेत.याप्रमाणे,संतांच्या उपदेशवचनांच्या अक्षता जरी सर्वांवर पडतात तरी 'तद्रूपतेसी सुलग्न' हे फक्त योग्य अधिका-याचेच लागते.इतरांकरिता तो उपदेश व्यर्थ जातो.
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
अध्यात्मिक विचारधारा १४
गंगा मुऴात पवित्रच आहे.पण तीत गावातील सांडपाणी मिसऴून घाण केली जाते.तद्वत् जीवन शुद्धच असते.पण विकाराची घाण मिसऴून ते मलिन बनविले जाते.
' ज्ञान तरी शुद्ध । परी इही असे प्ररूद्ध ।'
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
अध्यात्मिक विचारधारा १३
संसारात मनुष्य तृप्त नसतो. तो परमार्थाविषयी तृप्त असतो. म्हणजे संसार कितीही केला तरी करावाच वाटतो. कितीही मिळवले तरी मिळवावेच वाटते, भोगले तरी भोगावेच वाटते. परमार्थ मात्र थोडा केला तरी पुरेसाच वाटतो. हीच तृप्ती, पण ही खरी नव्हे. वस्तुत: हे बरोबर नाही. संसारात प्राप्त भोगाने मनुष्याने तृप्त असावे, "ठेविले अनंते तैसेची राहावे" व पुरुषार्थसाधनात अतृप्त असावे. म्हणजे कितीही पारमार्थिक साधने केली तरी करावीच वाटावीत. कारण त्यास फलरूपत आहे.. - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
अध्यात्मिक विचारधारा १२
वेदान्तशास्त्रात जीव अनादि मानला आहे. पण जीवत्व अनंत मानले नाही. अनादि ते अनंत असतेच असे नाही. एखाद्या घरात अंधकार शेकडो वर्षांचा जुना असला तरी दीप आणताच तो दूर पळतो, नव्हे प्रकाशमय बनून जातो. तद्वत अनादि अज्ञानामुळे चैतन्यास जीवदशा प्राप्त होते, ती आत्मज्ञान होताच नाहीशी होते, म्हणजे तो जीव ब्रह्मरूप होतो..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
अध्यात्मिक विचारधारा ११
प्रपंच व परमार्थातील एक फरक लक्षात ठेवण्यासारखा आहे. प्रपंचात ज्ञानानंतर क्रिया होत असते किंबहुना क्रिया न झाली तर ते ज्ञानही व्यर्थ समजल्या जाते. समोर ताट वाढलेले आहे, त्यातील पक्वान्नाचे ज्ञानही झाले आहे. पण भक्षणाची क्रिया न झाली तर तृप्ती नाही. अशी आणखीही अनेक उदाहरणे देता येतील. यासच 'आवडे ते वृत्ति किरिटी | आधी मनौनीचि उठी | मगते वाचा दिठी | करासी ये||' असे श्रीज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे. मात्र ज्ञानानुसार होणारी क्रिया त्या ज्ञानाच्या प्रकारावर अवलंबून असते. ते ज्ञान जसे सात्त्विक, राजस अथवा तामस असेल तद्वत् क्रियाही तशीच घडते..! -सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
अध्यात्मिक विचारधारा १०
जीवनाकरिता सर्व आहे. 'आत्मनमस्तुकामाय सर्व प्रियं भवति |' पण जीवन कशाकरिता आहे हा प्रश्न कोणी सोडविला आहे काय? जीवनाकरिता सर्व संसार संसाराकरिता व जीवन असे म्हटले तर अन्योन्याश्रय दोष येतो तसेच संसारातील कोणती वस्तू जीवनाकरिता आहे की जिचा जीव कधीही त्याग करू शकत नाही? याचे उत्तरही निश्चितपणे देता येत नाही. संसार हेच जर जीवनाचे ध्येय असते तर ऋषी, मुनी, साधुसंत संसाराच्या मागे लागले असते. - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
अध्यात्मिक विचारधारा ०९
समुद्राचे मूल्य अनंत आहे, म्हणजे त्याचे मूल्य कोणी करू शकत नाही. पण तेच जर मर्यादित जागेत प्रवाहात थेंबाथेंबाने परिच्छिन्नदशेस आले की त्याचे तसे तसे न्यूनाधिक मूल्य निर्माण होते. तद्वत् जीवनाचे मूळ ब्रह्म, ते अनंत आहे. पण देह, इंद्रिये, मन, प्राणादिकात आत्मत्वाने परिच्छिन्न दशेला आले म्हणजे त्याचे मूल्य तसे तसे मर्यादित होते. - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
अध्यात्मिक विचारधारा ०८
नाव जड आहे,पण तिच्याखाली भरपूर पाणी असेल तर ती तारून नेते.तद्वत कोणत्याही साधनाच्या बुडाशी भक्तीचा जिव्हाळा असेल तरच ती साधने तारून नेऊ शकतात. - सद्गुरु श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
अध्यात्मिक विचारधारा ०७
प्रपंचाचाच परमार्थ करता येतो. पारा, गंधक, सोमल, ताम्र, लोह इत्यादि विषे आहेत. कुशल वैद्य त्याच्यावर नाना प्रकारचे संस्कार करून त्याचे उत्कृष्ट रसायन बनवितो व ते मारक न होता तारक होते. तसेच संसारातील दोष घालविले म्हणजे तोच परमार्थ होतो. मनबुद्धीतील विकार घालविले, त्यांच्यावर कर्म, भक्ति, ज्ञान, विवेक, वैराग्यादि साधनांचे संस्कार केले की तेच शुद्ध होते व परमार्थमय बनते. 'मन हे राम झाले |'
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
अध्यात्मिक विचारधारा ०६
जीव हा ज्ञान, विज्ञान व अज्ञानात असतो. ज्ञान म्हणजेच स्वरूपस्थिती तेथे जाणीव (वृत्ती) नाही. विज्ञान म्हणजे प्रपंच, 'येर प्रपंच ते विज्ञान |' अज्ञान म्हणजे प्रपंचाच्या ठिकाणी सत्यत्वबुद्धी. हे जरी खरी आहे तरी असे दिसून येते की जीव अज्ञानात वा विज्ञानात कोठेही असो तो आपण ज्ञानातच आहो असे समजत असतो. याचे एक खरे कारण आहे की ज्ञान हे समान आहे. म्हणजे विज्ञान वा अज्ञान यात सामान्य ज्ञान आहेच. त्याचा तो प्रभाव आहे. - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
अध्यात्मिक विचारधारा ०५
नदीचे पाणी खाली वाहत राहणे सहज आहे. पण वर उंच चढणे मात्र सूर्यकिरणाधीन आहे. तसेच जीवन हे निम्नगामी आहे. ते अध:पतित होणे सहज आहे. पण उंच जाणे म्हणजे सर्व गतीच्या वर असलेल्या मोक्षाप्रत जाणे हे सहज नाही. त्याकरिता श्रीगुरूरूपी सूर्याची गरज आहे. खालील पाणी हे दृश्य आहे, पण वर जाताना ते सूक्ष्म होऊन जाते. तशा संसारातील अवस्था दृश्य आहेत, पण मोक्ष हा अदृश्य आहे, म्हणजे अनुभवैक गोचर आहे. - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
अध्यात्मिक विचारधारा ०४
सर्वच पृथ्वी कातड्याने मढवून काढण्याचा वृथा प्रयत्न करण्यापेक्षा आपल्या पायात जोडा घालून चालणे चांगले. म्हणजे कितीही काटे असले तरी मोडणार नाहित. तद्वत् जगातील सर्व दु:खे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपले मन अंतर्मुख करणे चांगले, म्हणजे कोणतेही दु:ख बाधा करणार नाही.
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
आध्यात्मिक विचारधारा ०३
जरी पाणी गढूळ झाले व आरोग्यास अपायकारक असले तरी उपायाने शुद्ध करता येते.तसेच जीवनात विकारांनी आणलेला गढूळपणा विवेक वैराग्यादि साधनानी नाहीसा करून ते शुद्ध करता येते. - सद्गुरु श्रीधुंडामहाराज देगलूरकर
आध्यात्मिक विचारधारा ०२
ज्या ठिकाणी गंगा अतिशय खोल व विस्तृत आहे अशा प्रवाहात काही घाण जरी मिसळली तरी आपल्या सामर्थ्याने ती घाण गंगा नाहीशी करते.'गावमागील ओहोळ।गंगा न म्हणे अमंगळ ।।'तसेच जाचे जीवन खोल आहे,ते शुद्धच राहते,कोणतेही विकार त्यास अशुद्ध करीत नाहीत.किंबहुना तो विकार तेथे आला की शुद्धच होतो.
- सद्गुरु श्रीधुंडामहाराज देगलूरकर
आध्यात्मिक विचारधारा ०१
गंगा मुळातच पवित्र आहे.पण त्यात गावातील सांडपाणी मिसळून घाण केली जाते.तद्वत जीवन शुद्धच असते.पण विकाराचा घाण मिसळून ते मलिन बनवले जाते.'ज्ञान तरी शुद्ध । परी इही असे प्रसिद्ध ।'
- सद्गुरु श्रीधुंडामहाराज देगलूरकर
Subscribe to:
Comments (Atom)